गौरी पुजन बद्दल माहिती/Gouri pujan Baddal Mahiti

 


        भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला सर्वत्र गणपती बाप्पाची आगमन होते. आणि त्या पाठोपाठ लगेच श्री महालक्ष्मी म्हणजे गौरीचे आगमन होते. आणि याच विषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत. 

        गौरी पूजनाचा हा सण सर्वत्र हर्ष, उत्साहाने साजरा केला जातो. तीन दिवसाच्या या व्रताला पश्चिम महाराष्ट्रात ज्येष्ठ गौरी आणि मराठवाड्यात श्री महालक्ष्मी या नावाने ओळखले जाते. हिंदू शास्त्रात गौरी यांना शिवाच्या शक्तीचे आणि गणपती बाप्पाच्या आईचे रूप मानले गेले आहे. अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन, ज्येष्ठ नक्षत्रावर त्यांचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर त्यांचे विसर्जन केले जाते. आणि म्हणूनच या व्रताला ज्येष्ठ गौरी या नावाने ओळखले जाते. 

       जेव्हा महालक्ष्मी यांना माहेरपणाचे सुख अनुभवायचे असते तेव्हा त्या गौरी म्हणून येतात,अशी मान्यता आहे. म्हणूनच त्या आपुलकीने त्यांचे स्वागत केले जाते. महालक्ष्मी गौरी, सखी पार्वती, जेष्ठ कनिष्ठ अशा जोडीने त्यांना घरात आणले जाते. घरातील सर्व माहेरवाशीण स्त्रिया त्यांचं स्वागत करतात आणि पूजा करतात. मित्रांनो, समुद्र किंवा नदीतील खड्यांच्या गौरी, सोने, चांदी, पितळ, शाडू, माती पासून बनवल्या गेलेल्या मुखवट्यांच्या गौरी, हळदीच्या किंवा तेरड्याच्या रूपांच्या गौरी, धान्याची रास बनवून त्यांवर मुखवटा लावलेल्या गौरी अशा विविध प्रकारच्या गौरी बसवल्या जातात. गौरीला नवीन वस्त्र, सोने, चांदी, दागिने घालून सजवले जाते. तसेच गौरीसोबत त्यांच्या मुलांचीही मांडणी केली जाते. महालक्ष्मीची गौरी यांच्या मांडणीत ठिकठिकाणी फरक जरी असला तरी मुख्य हेतू हा धान्य व लक्ष्मीच्या पूजनाचाच असतो. म्हणूनच शेती हा मुख्य व्यवसाय असणाऱ्यांच्या घरी धान्याची रास बनवून त्यांची पूजा केली जाते. 

          योग्य वेळ व नक्षत्रातील पंचाग पाहून त्यांना घरी आणले जाते, व त्यांची पूजा केली जाते. तीन दिवसांच्या या व्रतादरम्यान पहिल्या दिवशी गौरीची आव्हान केले जाते. घरातील परंपरेनुसार गौरीला घरी आणले जाते. उंबऱ्यातून येताना ज्या बाईच्या हातात गौरी असतील तिचे पाय धुतले जातात. घरातील दरवाजापासून ते गौरी बसवण्याच्या ठिकाणापर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवत गौरींना घरात आणले जाते. 

           गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील धनधान्य व समृद्धीची जागा दाखवली जाते. जेणेकरून तिथे त्यांचा आशीर्वाद लाभून, समृद्धी घरात लाभते. अशी मान्यता आहे. गौरीच्या मुखवट्याला नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजवले जाते. गौरीला ज्या जागेवर बसवणार तेथे छान सजावट व फुलांची रास केली जाते. पहिल्या दिवशी गौरीला भाजी - भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी गौरीची पूजा केली जाते. त्यांना शेवंतीची वेणी, चाफ्याची फुले व गजरे वाहिले जातात. पूजा व आरती झाल्यानंतर त्यांना फळे व मिठाई, फराळांचे प्रकार जसे की- लाडू, चकल्या, शेव, करंजा, शंकरपाळे इत्यादींचा नैवेद्य दाखवला जातो. नंतर त्यांना गोडधोडाचे जेवण म्हणजे -पुरणपोळी, कोणताही एखादा गोड पदार्थ, वरण-भात, कोणत्याही 16 प्रकारच्या भाज्या व पंचामृत यांचा नैवेद्य दाखवला जातो. 

       गौरीला अनेक प्रकारची फुले व पत्री वाहिली जातात. संध्याकाळी हळदी- कुंकवाचा कार्यक्रम ठेवला जातो. तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन केले जाते. त्यांची पूजा आरती झाल्यानंतर त्यांना गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. आणि पुन्हा येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो.अशा प्रकारे माहेरवाशीण येतात, राहतात आणि पुन्हा येण्याचं वचन देऊन निघून जातात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.