आपली मायबोली- मराठी भाषा/Aapli mayboli Marathi Bhasha
आज देशात विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. जसं की मराठी, पंजाबी, तेलगू, मल्यालम, इंग्रजी अशा प्रकारच्या अनेक भाषा बोलल्या जातात. जो तो आपल्या भाषेत स्वतःचे विचार मांडत असतो. ज्याला त्याला स्वतःच्याच भाषेचा गर्व असतो. तसाच गर्व मलाही माझ्या भाषेचा आहे. माझी भाषा ही मराठी आहे आणि मला तिचा खूप गर्वही आहे.
मराठी भाषा ही महाराष्ट्राची आणि भारताची शान आहे. ती आपल्या संस्कृती, परंपरा आणि मूल्यांचे प्रतिनिधित्व आहे. मराठी ही एक राज्यभाषा आहे. ती फक्त भाषाच नसून समृद्ध जीवनाचे प्रतीक आहे. आपल्या मराठीला फार मोठी जुनी परंपरा लाभलेली आहे. अगदी नवव्या - दहाव्या शतकात मराठीत कोरलेली निबंध आजही उपलब्ध आहेत. मराठीत लिहिलेली ज्ञानेश्वरी तसेच संत तुकारामांची गाथा आजही लोकांच्या मनात वसलेली आहेत. मराठी ही मुख्यतः महाराष्ट्रात आणि मोठ्या प्रमाणात गोवा येथे बोलली जाते. शेतकरी, कामगारी आणि व्यवसायिक बांधवांनी ही परंपरा समृद्ध केलेली आहे. हे वैभव आपल्याला सोन्यासारखं लाभलेलं आहे.
आजही खेड्यातील लोक अभिमानाने एकमेकांशी मराठीत बोलतात. पण शहरातील लोकांना मराठीचा विसर पडत चाललेला आहे. याचं खूप दुःख वाटत की,जो तो आता इंग्रजीमध्ये बोलू लागलेला आहे. आज कालच्या मुलांना तर लहानपणापासूनच स्पोकिंग इंग्लिशचे क्लास लावले जातात, कारण माझ्या मुलाला इंग्रजी बोलता आली पाहिजे. ते ही एका अर्थाने बरोबरच आहे. कारण इंग्रजी बोलणे ही एक काळाची गरज आहे. इंग्रजी न आल्यामुळे कित्येक जण आपली नोकरी ही गमवतात. मान्य आहे की, इंग्रजी आली पाहिजे परंतु इंग्रजी बोलण्याच्या नादात आपण आपल्या मातृभाषेला विसरत चाललेलो आहोत.
पण एक गोष्ट नक्कीच आहे, जेव्हा आपण एकमेकांच्या भावना समजून घेतो त्याचा आनंद फक्त आपल्याला आपल्याच मायबोलीत म्हणजे मराठीत मिळतो. तो आनंद दुसऱ्या कोणत्याच भाषेत मिळत नाही. जर दोन माणसे भेटली तर त्यालाही माहित असते की, याला मराठी बोलता येते आणि आपल्यालाही माहित असते की मी मराठी मध्ये बोलू शकतो. पण दोघेही एक फॅशन म्हणून इंग्रजी बोलतात. मोठ मोठ्या ऑफिस मध्ये मराठीत बोलले तर लोक काय म्हणतील? याचा विचार आपण करत राहतो. लोकांचे तर जाऊ द्या आपल्याला स्वतःला मराठी बोलण्याची लाज वाटू लागते.
जसं आपलं आणि आपल्या आईचं नातं असतं. तसंच नातं आपलं आणि आपल्या मराठीचा आहे. मराठी बोलण्याची लाज नाही तर, अभिमान वाटला पाहिजे. ज्या मराठी मातीत शिवाजी महाराजांसारख्या वीर मराठ्यांनी जन्म घेतला होता. त्याच मातीत आपण ही जन्मलेलो आहोत. त्यामुळे आपण अभिमानाने सांगायला हवे की, माझी मायबोली ही मराठी आहे आणि मला तिचा गर्व आहे.
Post a Comment