रोहित शर्मा /Rohit Sharma

          


           एक दिवसीय सामन्यामध्ये एक-दोन नाही तर तीन दोहरे शतक लावणारा खेळाडू कोण? आयपीएल च्या 05 ट्रॉफी जिंकणारा क्रिकेट खेळाडू कोण? 2019 चा वर्ल्ड कप आपण हरलो असलो तरी एकाच वर्ल्ड कप मध्ये 05 शतक करून गोल्डन बॅट जिंकणारा खेळाडू कोण? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू कोण? असे अनेक प्रश्न जरी असले तरी त्याचे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे जर्सी क्रमांक "45 रोहित शर्मा" व चाहत्यांचा लाडका "हिटमॅन" होय. आज गावात नाही तर शहरात, शहरातच नाही तर देशात, देशातच नाही तर विदेशात  रोहित शर्माची प्रशंसा केली जाते, असे ते एक महान क्रिकेट खेळाडू आहेत.

          रोहित शर्मा यांचा जन्म 30 एप्रिल 1987 मध्ये नागपूर, महाराष्ट्र मध्ये झाला होता. त्यांचे वडील गुरुनाथ शर्मा हे ट्रान्सपोर्ट मध्ये काम करत होते. त्यांच्या आईचे नाव पूर्णिमा शर्मा हे आहे. आर्थिक अडचणींमुळे रोहित शर्माचे पालन पोषण त्यांच्या आजी-आजोबांनी आणि काकांनी मुंबईच्या उपनगरात बोरिवली येथे केले. तर त्यांचे आई वडील डोंबिवली येथे एका खोलीच्या घरात राहत होते. लहानपणापासूनच रोहित शर्मा यांना क्रिकेटची आवड होती. 1999 मध्ये त्यांच्या काकांच्या आर्थिक पाठिंब्याने क्रिकेट शिबिरात सहभागी झाल्यावर त्याचा प्रवास सुरू झाला. तेथे त्यांचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्यांची प्रतिभा ओळखली आणि त्यांची शिफारस स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल मध्ये केली, जिथे त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. ज्यामध्ये त्यांचे शिक्षण आणि क्रिकेट प्रशिक्षक समाविष्ट होते. त्यांच्या क्रिकेट करियरला वळण देण्यात त्यांच्या काकांचे मोलाचे योगदान आहे. 

            रोहित शर्मा यांनी वयाच्या विसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरुवात केली होती. त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात 23 जून 2007 रोजी आयर्लंड विरुद्धच्या वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांपासून झाली. त्यांची कामगिरी जगासमोर तेव्हा आली जेव्हा t-20 वर्ल्ड कप 2007 च्या फायनल मॅच मध्ये भारतीय संघ संकटात होता त्यावेळेस त्यांनी 16 बॉल मध्ये 33 धावा केल्या होत्या, तेथूनच त्यांच्या क्रिकेट करिअरला टर्निंग पॉईंट भेटला. 

            2011 च्या एक दिवसीय वर्ल्ड कप मध्ये त्यांची नेमणूक न झाल्यामुळे रोहित शर्मा नाराज झाले होते. परंतु त्यांनी सतत मेहनत व कठीण परिश्रम करून पुन्हा  आपली जागा मिळवली. 2018 एशिया कपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम सामन्यात बांगलादेशला हरवून एशिया कप जिंकला होता. वर्ष 2023 ला एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये कर्णधार म्हणून भारतीय क्रिकेट संघाला फायनल पर्यंत पोहोचवले. भारतीय संघ हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली फायनल सामना हारला, परंतु त्यांनी लोकांचे मन जिंकले. कारण वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय संघाने चांगली कामगिरी करत एकही सामना हरला नव्हता. त्यानंतर वर्ष 2024 च्या t-20 वर्ल्ड कप मध्ये रोहित शर्माच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने वर्ल्ड कप ट्रॉफी आपल्या नावावर करून घेतली.  रोहित शर्मा यांनी  t-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर लगेचच t-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली. एवढेच नव्हे तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 05 वेळेस आयपीएल ट्रॉफी जिंकलेली आहे. 

           रोहित शर्मा ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप शतक आणि दोहरे शतक बनवले आहेत. रोहित शर्मा असे एकमेव खेळाडू आहेत, ज्यांनी एक दिवसीय सामन्यांमध्ये तीन वेळेस दोहरे शतक बनवले आहेत. आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा  म्हणजेच  264 धावा करत विश्वविक्रम बनवला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड सुद्धा त्यांच्याच नावावर आहे. असे कित्येक रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहेत. रोहित शर्माची फलंदाजी ही आक्रमक असल्यामुळे त्यांना "हिटमॅन" म्हणून ओळखले जाते.  

          संघामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिल्यामुळे त्यांना अर्जुन पुरस्कार व मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.  या पुरस्कारा व्यतिरिक्त त्यांना आणखी काही पुरस्कारही भेटलेले आहेत. त्यांनी क्रिकेटच्या जगामध्ये हे यश आपल्या स्वतःच्या मेहनतीच्या बळावरती प्राप्त केले आहेत. ते आजच्या युवकांसाठी एक प्रेरणा स्त्रोत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.