हरवलेले बालपण/Haravlele Balpan
एक बालपण होते, त्यामध्ये नुसता आनंदच आनंद होता. कुठल्याही प्रकारचे टेन्शन नव्हते आणि असले तरी खेळायच्या नादात सर्व विसरून जायचे. फक्त मज्जाच मज्जा होती .खाणे, पिणे आणि झोपणे या तीनच गोष्टी माहीत असायच्या. या व्यतिरिक्त असलेल्या गोष्टी जाणून घेण्याची मानसिकता ही नसायची.
बालपणात शाळेतही नुसता धिंगाणाच चालायचा. अभ्यास जरी गुरुजींनी दिला तरी त्यांच्यासमोर थोडं अभ्यास करायचं नाटक करायचे आणि बाहेर गेल्यानंतर पुन्हा मस्ती चालू करायची. भांडणे तर पाच-पाच मिनिटाला करायची आणि दोन मिनिटात लगेच पुन्हा मैत्री ही बनवायची. कोण मोठं, कोण लहान, कोण श्रीमंत, कोण गरीब , कोण मठ्ठ आणि कोण हुशार याचा काहीही अर्थ कळत नसायचा. सर्वांना समान मानून अगदी मनमेळावा सारखे राहायचे व आयुष्याचा आनंद घेत राहायचा.
बालपणात आयुष्याचा नीट अर्थही कळत नसायचा, पण तेच आयुष्य बरे होते. मोठे झाल्यानंतर माणूस म्हणजे आपणच मोठमोठे स्वप्न पाहत असतो की, मला नोकरी पाहिजे, मोठा बंगला पाहिजे, दारासमोर दोन-चार गाड्या पाहिजेत या सारख्या अपेक्षा ठेवतो, व त्या पूर्ण करायच्या मागे लागतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण आपापल्याच जीवनात व्यस्त राहतो. दुसरे कोणीही आपल्याला दिसत नाही फक्त आपण आणि आपला स्वार्थ.
आज घरात मोबाईल, टी-व्ही या उपकरणामुळे मुले त्यातच व्यस्त राहतात आणि शाळेतूनसुद्धा अभ्यास एवढा देतात की त्याचा मुलाला आनंद नाही तर दुःख होते. शाळेनंतर ,ट्युशन हे असं दररोजची दिनचर्या बनली आहे. यामुळे लहान मुलांचा आपापसात खेळायचा संपर्क ही तुटला आहे.
ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस मातीतले खेळ जशी विटी- दांडू, कबड्डी, खो-खो असे विविध प्रकारचे खेळ आम्ही खेळायचो.आता आत्ताच्या मुलांना मातीत पाय ठेवणे हे पण घाण वाटते. थोडा पाय मातीने भरला की लगेचच धुवून काढतात. आज घरात विविध प्रकारचे फळे आहेत पण खायला कोणीच नाही. मुलांना तर मॅगी ,बिस्किट या पलीकडे काही दिसतच नाही. आमच्या वेळेस फळे खाण्यासाठी ही भांडणे व्हायची पण त्यातच खरा आनंद मिळायचा. आजचे मुले पहिल्या मुलांपेक्षा हुशार तर आहेतच त्यामध्ये काही शंका नाही पण आजच्या पिढीतील लहान मुलांना पहिल्यासारखा मनमोकळे पणा व मातीतले खेळाचे वातावरण मिळणे अवघडच आहे. आणि कदाचित ते या गोष्टीपासून मुकावलेली आहेत.
बालपणाचे आयुष्य मिळणं आता काही शक्य नाही. हरवलेलं बालपण पुन्हा सापडणं अवघडच आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील बालपण हे निरागसच असतं.
"बालपण हे प्रत्येकाच्या आयुष्यातील गोडपण असते".
Post a Comment