नेमके टेन्शन म्हणजे तरी काय? /Nemake Tention mhanje tari kay?

          

            नेमके टेन्शन म्हणजे तरी काय? आज या जगात 99% लोक नुसते टेन्शनच घेत आहेत. याचे कारण जाणून घेण्याचा आपण कधी प्रयत्न केला आहे का? तर नाही. याच टेन्शनमुळे कित्येक जण आपला जीवही गमवून बसतात, याच टेन्शनमुळे कित्येक जणांचे घरही उध्वस्त झालेले आहे. एवढेच नाही तर ज्या वयात मुलांना खेळायचे, अभ्यास करायचा असतो, त्या वयात मुले टेन्शनमुळे आजारांचे शिकार होतात. मग टेन्शन नक्की आहे तरी काय?

            मराठीत सांगायचं झालं तर टेन्शन म्हणजे ताण -तणाव एक प्रकारची मानसिक अवस्थेची व्याधी आहे. मनात नको असलेल्या विचारांमुळे अनावश्यक कारणामुळे जी स्थिती होते तो म्हणजे तणाव. तणाव हा शारीरिक, मानसिक दोन प्रकारांचा असू शकतो. शारीरिक तणावातून माणसे तर बाहेर येऊ शकतात, पण मानसिक तणाव हा खूपच भयंकर असतो. माणूस विनाकारण कोणत्याही गोष्टीचा त्रास घेतो. एखादी किरकोळ गोष्ट असते, जर त्यावरती थोडा विचार केला तर, लगेचच त्यावरती मार्ग निघू शकतो. म्हणजेच ती समस्या नष्ट होऊ शकते. परंतु नाही, ते असं का झालं? कोणी केलं? काय गरज होती? अशा फालतू प्रश्नाने विनाकारण मेंदू विचार करण्यास भाग पडतो. कधी कधी आपण एवढा विचार करतो की, जीवन संपवण्याच्या  टोकावरती जाऊन पोहोचतो.

            जर या गोष्टी मधून बाहेर पडायचे असेल तर, सर्वात अगोदर स्वतःला बदलणे गरजेचे आहे. सतत आपण दुसऱ्याला टोमणे मारत असतो. हा असा आहे, तो तसा आहे, पण मुळात आपण कसे आहोत याचा कधी विचार केला आहे का? स्वतःमध्ये बदल करणे खूप गरजेचे आहे. सहजासहजी बदल होणे सोपे नाही. त्यासाठी प्रयत्न करायला हवे. मन एकाग्र ठेवायला हवे. नुसते करायचे म्हणून करायला नको. अगदी उत्साहाने बदल करण्यास सुरू करायला हवा. कधी कधी माणूस बदल करण्यास सुरुवात तर करतो, पण ते म्हणतात ना "नव्याचे नऊ दिवस" असतात. बस थोडे दिवस केले की, पुन्हा पहिल्यासारखेच वागायला चालू करतात. असं न करता कायम आपल्या निश्चयावर ठाम राहणे शिकले पाहिजे.

            स्वतःला शांत ठेवायला शिकले पाहिजे. काही गोष्टी टाळायला शिकले पाहिजे. हे करताना काही लोकांना यश येईल, तर काहींना अपयशही येईल. काही सुखी असतील तर, काही दुःखी. कारण हे आयुष्य आहे यात चढ उतार तर येणारच ना. आणि प्रत्येकाचे आयुष्य हे वेगवेगळे असते. पण अशा परिस्थितीमधून स्वतःला सावरायला शिकले पाहिजे. मनाचा तोल सांभाळायला शिकले पाहिजे. आणि ज्या लोकांना या गोष्टी जमतात ना ते, खऱ्या अर्थाने आयुष्याचा आनंद घेत असतात.  जे लोक अपयशी होतात, त्यांनी खचून न जाता पुन्हा नव्याने सुरुवात केली पाहिजे. मनात जिद्द असली की, सगळ्या गोष्टी शक्य होतात.

            आयुष्य हे आपण किती जगतो, यापेक्षा ते कसे जगतो याला जास्त महत्त्व असते. जास्त विचार करण्यापेक्षा थोडाच करा, पण तो चांगला करा. जो की आपल्या मेंदूला टेन्शन पासून दूर ठेवेल . नुसते मेंदूलाच नाही तर आपल्या पूर्ण शरीराला तणावग्रस्त वाटणार नाही. यामुळे आपण आनंदी राहतोल. आणि जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदीमय जगतोल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.