शेतकरी/Shetkari
जर शहरातील माणसांना विचारले की, शेती बद्दल माहिती सांगू शकता का? तर ते लगेचच गुगल किंवा युट्युब वरती सर्च करतील ,पण हाच प्रश्न जर ग्रामीण भागातील माणसांना विचारला तर ते अगदी तोंड पाठ असल्यासारखे धडाधड माहिती सांगतील. याचं कारण म्हणजे भारत अजूनही खेड्यातच वसलेला आहे असे म्हटले तरी काही हरकत नाही. भारत हा एक कृषिपधान देश असल्याने शेती करणे ,हे काही शहरी भागात होऊ शकत नाही. ग्रामीण भागात एक शेतकरी संस्कृती वसलेली आहे. ज्या द्वारे मनुष्य आपल्या मातीशी बांधला गेला आहे. शेती हेच खेड्याकडे प्रमुख उपजीविकेचे साधन आहे. यामुळे ग्रामीण भागातील सर्वच माणसांना शेतीबद्दल ज्ञान अवगत आहे.
शेतकरी हा आपल्या समाजाचा कणा आहे. जसं आपल्या शरीराला पाठीचा कणा सगळ्या भागांना जोडून ठेवण्याचे काम करतो, आणि जोडलेल्या भागांना नियंत्रित ठेवतो. जर पाठीचा कणा नसेल तर आपण शरीरातील कोणत्याच अवयवाची हालचाल करू शकत नाहीत. एवढेच नाही तर पाठीचा कणा नसेल तर, पूर्ण शरीरच काम करायचे सोडून देते. याच सांगायचं तात्पर्य म्हणजे -जसा पाठीचा कणा आपल्या शरीरासाठी सर्वात मुख्य भूमिका बजावतो. त्याचप्रमाणे शेतकरी हा पण आपल्या सर्वांच्याच जीवनात मुख्य भूमिका बजावतो. एका प्रकारे शेतकरी हाच आपल्या समाजाचा पाठीचा कणा आहे. खरा अभिनेता तर शेतकरीच आहे. पण लोक खऱ्या अभीनेत्याला विसरून दुसऱ्याच अभिनेत्याकडे आकर्षित होतात. जर एखादा सेलिब्रिटी आला की ,सगळे मीडियावाले त्याच्याच मागे मुलाखती घेण्यासाठी पळतात. पण असं कधी झाला आहे का , मीडियावाले जसे सेलिब्रिटी मागे पळतात, तसे शेतकऱ्यामागे फोटोसाठी किंवा मुलाखतीसाठी पळत आहेत का? तर नाही. कारण लोकांना जे चांगले दिसतात ,ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांच्याकडेच जाण्याची सवय लागली आहे. परंतु ही खूप खंताचे बाब आहे असं मला वाटतं. आपल्या सर्वांचा खरा हिरो तर शेतकरीच आहे.
शेतकरी शेतात रात्रंदिवस काम करून आपल्या कुटुंबाला जगवतो. दिवसभर काम करूनही चेहऱ्यावर सतत आनंद ठेवतो. शेतकऱ्याचं आणि शेतीचं नातं हे अतूट असतं. त्यामुळेच तर म्हणतात शेतकरी. जेवढा संयम शेतकऱ्यात असतो ना, तेवढा कोणातच नसतो.कारण वर्षभर शेतात कष्ट करून तो आपल्या कष्टाच्या फळाची वाट पाहत असतो. पशु ,पक्षी, प्राणी हेच शेतकऱ्याचे जिवलग मित्र असतात. तो आपलं आयुष्य निसर्गाच्या सानिध्यातच घालवतो. त्याची शेती ही निसर्गावरच अवलंबून असते.
पण आजही शेतकऱ्यापुढे अनेक समस्या आहेत. जर पाऊस पडला नाही तर शेतकऱ्याचे कित्येक नुकसान होते. त्यामुळे त्याला घर चालवणे हे अवघड जाते. पैसा नसल्यामुळे कर्जही होते. या कर्जामुळे अनेक शेतकरी आत्महत्येला बळी पडतात. आज शहरातील लोक मस्त अन्न बनवून खातात. त्यांना अन्न पुरवण्याचे काम हे शेतकरीच करतो. त्यामुळे शेतकऱ्याला अन्नदाता म्हटलं तरी काहीही हरकत नाही.
जो स्वतः शेतकरी आहे व ज्याचे कुटुंब शेतीवर अवलंबून आहे, त्यालाच शेतकऱ्याची व्यथा समजू शकते .बाकी लोकांना समजणे जरा अवघडच आहे. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, जर शेतकरी सुखी असला तर आपणही सुखी राहू शकतो. शेतकरी हा देशाचा आत्मा आहे. शेतकऱ्याचे जीवन हे आपल्याला अनेक प्रकारच ची शिकवण देते. त्यांचे कष्ट आणि संयम हे आपल्यासाठी एक महत्त्वाचे उदाहरण आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आनंदित ठेवणे व मदत करणे ही आपली जबाबदारी आहे.
Post a Comment