सावित्रीबाई फुले/Savitribai Phule
आपण जीवनामध्ये एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे की ,स्री ही कधीच हार मानत नसते, तिला हरण्यासाठी भाग पाडले जाते. लोक काय म्हणतील हे म्हणून लहानपणापासून भीती दाखवली जाते. आपण आज शाळेमध्ये जातो, फक्त मुलेच नाही तर मुली पण शाळेमध्ये जातात. आपण ज्या बद्दल माहिती घेणार आहोत त्या जर नसत्या तर कदाचित आज मुलींनी शाळेचे तोंडही पाहिले नसते. पण मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले होय.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे (पाटील) हे होते व आईचे नाव लक्ष्मीबाई नेवसे होते. त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. त्यांची लहानपणाची एक गोष्ट म्हणजे-त्या एक वेळेस इंग्रजी पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांच्या वडिलांनी हे पाहिले आणि त्या पुस्तकाचे पाने फाडून फेकून दिली. आणि त्यांना समजून सांगितले की, हे बघ आपण ज्या समाजात जन्मलो आहोत त्या समाजात शिकण्याचा, वाचनाचा काहीच अधिकार नाही. त्या क्षणापासून सावित्रीबाईंच्या मनात शिक्षणाबद्दल आग भेटली होती आणि त्यांची इच्छा होती की, मी स्वतःही शिकेल आणि माझ्यासोबतच मुलींनाही शिकवेल. वयाच्या फक्त नव्या वर्षी त्यांचे लग्न ज्योतिराव फुले यांच्याशी लावून दिले. शिक्षणाचा विचार मात्र सासरीही त्यांच्या मनात फिरतच होता. नशिबानेही त्यांची साथ दिली. म्हणजेच ज्योतिराव फुले यांनीही सावित्रीबाईंना शिक्षण देण्यास मदत केली. घरात शिक्षण देण्यासारखे वातावरणही नव्हते. मग जेव्हा जोतिराव फुले हे शेतात कामासाठी जायचे, त्यावेळेस सावित्रीबाई त्यांना जेवण घेऊन जायच्या ,मग त्यावेळेस ज्योतिराव फुले त्यांना शिक्षण देत असायचे. पण ही गोष्ट जास्त दिवस लपून राहिली नाही. जसं त्यांच्या कुटुंबाला याबद्दल माहिती मिळाली त्याच वेळेस त्यांना दोघांना ही घराबाहेर काढले. पण म्हणतात ना जर एखादी गोष्ट मनापासून मिळवायची असेल तर त्यासाठी कोणतेही मोठे संकट असो ते काहीच करू शकत नाही.
घरच्यांनी तर बाहेर काढलेच होते. घर तर सोडले होते, पण त्यांनी समाज कल्याण काही सोडले नव्हते. नंतर ज्योतिबा फुले यांचे मित्र उस्मान शेख यांच्या घरी त्यांनी निवास घेतला. उस्मान शेख ची बहीण फातिमा शेख ही सावित्रीबाई फुले यांची चांगलीच मैत्रीण झाली. बोलता बोलता सावित्रीबाईंनी त्यांना सांगितले की, मला शिकायला खूप आवडते आणि त्या क्षेत्रात मला पुढे जायचे आहे. नंतर दोघींनी मिळून अभ्यासही केला. जेव्हा सावित्रीबाई फुले या सतरा वर्षाच्या होत्या त्यावेळेस त्यांना असे वाटायचे की बालिकांसाठी एक शाळा चालू करायला हवी. ज्या सतराव्या वयात आपण आपले शिक्षणही पूर्ण करत नाहीत . त्या वयात त्या शिक्षिका बनायचे स्वप्न पाहत होत्या. मुलींच्या शिक्षणाबाबत लोकांचा दृष्टिकोन बदलण्याच्या प्रयत्नात होत्या.
जर शाळा चालू करायची म्हणली तर पुरे तेवढे पैसे व संसाधनेही नव्हती आणि सर्वात मोठा प्रश्न हा होता की शाळा कुठे चालू करायची? मग एक जानेवारी 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत भिडे वाड्यात त्यांनी पहिली शाळा चालू केली.सावित्रीबाई फुले सोबत फातिमा शेख ही त्या शाळेत मुलींना शिकवू लागल्या. फातिमा शेख यांनीही सावित्रीबाईंना खूप मदत केली. पहिली शाळा त्यांनी चालू केली. आणि1851 येईपर्यंत आणखी शाळा उघडल्या होत्या. 150 मुली या शाळेमध्ये शिक्षण घेत होत्या. एका वेगळ्याच मार्गावर त्या चालत होत्या. मैत्रिणींच्या व ज्योतिबा फुले यांच्या सहाय्याने त्यांचे प्रयत्न चालू होते. पण जेव्हा त्या शाळेत जात असत, त्यावेळेस लोक त्यांच्या अंगावर चिखल ,सडलेले पदार्थ फेकत असत. हे दररोज चालत असायचे. एक वेळेस ज्योतिबा फुले त्यांना म्हणाले की, शाळेत जाताना एक साडी पिशवीत टाकून नेत जा. अंगावरची साडी खराब झाल्यानंतर बदलून दुसरी साडी घालून मुलींना शिकवत जा. सावित्रीबाईंनी त्यांचे ऐकले पण दररोज हेच चालत असल्याने सावित्रीबाईंनाही याचा खूप कंटाळा आला होता. एके दिवशी त्या शाळेत जात असताना, एक माणूस त्यांना आडवा आला आणि म्हणाला की बस झालं आता हे नाटक, आज पासून शाळेत जायचे बंद, असे काहीही वेडेवाकडे बोलू लागला. माणसेही ते ऐकतच होती. पण कोणीही सावित्रीबाईंच्या मदतीला आले नाही. शेवटी सावित्रीबाईंनी स्वतःची रक्षा स्वतःच केली. त्या माणसाच्या एक कानाखाली लावून दिली. व त्या दिवसापासून सावित्रीबाईंना कोणीही त्रास दिला नाही.
सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाचा हक्क तर दिलाच पण त्याबरोबरच समाज परिवर्तनाचेही महान कार्य केले. त्यांनी समाजातील बालविवाह, सती प्रथा, केशवपन अशा वाईट प्रथांनाही विरोध केला. विधवा आणि अनाथ गोरगरीब मुलांसाठी अनाथ आश्रम उभारले. त्यांच्या या कार्याचे कौतुक त्याकाळी इंग्रजांनीही केले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या लेखिका आणि कवयित्री देखील होत्या. त्यांनी काव्यफुले, बावनकशी ,रत्नाकर यासारखे काव्यसंग्रह लिहून समाज प्रबोधन केले.
दुर्दैवाने इसवी सन 1897 मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातले होते. या रोगाच्या साथीत प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनाही प्लेग झाला. अखेर 10 मार्च 1897 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला.
सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज प्रत्येक घरातील मुलगी शिकत आहे. प्रत्येक क्षेत्रात आज आघाडीवर आहे. याचे श्रेय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनाच जाते. मुलींच्या खऱ्या आयुष्याचे रहस्य सावित्रीबाई फुलेच आहेत. खरंच सावित्रीबाई फुले या महान क्रांतीज्योती महिला होत्या. त्यांनी मुलींच्या शिक्षणाची ज्योत ही सर्वत्र पेटवली.
Post a Comment