व्यसनमुक्ती- काळाची गरज/vyasanMukti kalachi Garaj..

            

            व्यसन हे कुठलेही असो मग ते वाईटच.  दिवसेंदिवस माणूस हा व्यसनाधीन होत चालला आहे. नेमकं व्यसन म्हणजे तरी काय? तर शरीराला लागलेली एक वाईट सवय म्हणजे व्यसन होय. सवय ही कुठलीही असो चांगली या वाईट एकदा का ती शरीराला लागली, की जाणं अवघडच राहतं. पण चांगल्या सवयी लावणारे लोक क्वचितच आढळतात. अधिक तर संख्या ही वाईट सवयींच्याच लोकांची आढळते, कारण चांगल्या गोष्टी आत्मसात करायला वेळ लागतो आणि वाईट गोष्टींना वेळ लागत नाही. त्या लगेचच शरीराला लागतात. व्यसन ही सुद्धा एक वाईटच सवय आहे जी शरीराला पटकन लागते. 

        व्यसनामुळे अनेकांचे आयुष्य ही वाया जाते. व्यसन करणाऱ्यांपैकी तरुणांची संख्या ही सर्वात जास्त आहे. ही खूप खंताची बाब आहे कारण ज्या तरुणाईला आपल्या देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी सक्षम बनले पाहिजे, ती तरुणाई आज व्यसनाधीन होऊन अधोगतीकडे येत आहे. ज्या मुलांचे वय हे नवीन गोष्टी शिकण्याचे असते ती आज व्यसनामुळे या गोष्टींपासून दुरावली आहेत. ही बाब काळजी घेण्यासारखी आहे. यासाठी प्रत्येक घरातील कुटुंबांनी मुलांवर वेळोवेळी लक्ष दिले पाहिजे. पण जर का घरातील मोठी माणसेच व्यसन करत असतील तर लहान मुले आपोआपच त्यांचे अनुकरण करतील. यासाठी घरातील प्रत्येक व्यक्ती ही व्यसनमुक्त होणे गरजेचे आहे. 
        नुसती तरुणच नव्हे तर महिला, वयस्कर माणसेही व्यसन करतात. कोणीही असो व्यसन करणे हे वाईटच गोष्ट आहे. मोठ-मोठया शहराठिकाणी पार्टीमध्ये म्हणा किंवा अनेक समारंभामध्ये एक मौज म्हणून दारूचे व्यसन केले जाते. थोड्या काळापूर्ती ही मजा वाटते पण कदाचित ही आयुष्याची सजा पण बनवू शकते. पण हे लोकांना कळायला तयारच नाही. 
            

            दारू पिणाऱ्यांनी नाही तर दारू विकणाऱ्यांनी माड्या बांधल्या आहेत ही एक वस्तुस्थिती आहे. काय चांगलं आणि काय वाईट, काय करायला पाहिजे आणि काय नाही हे ज्याला कळते तोच आयुष्यात यशस्वी बनतो. आणि व्यसनापासून लांब राहतो. आज याच व्यसनामुळे कित्येक जणांचे घरही उद्ध्वस्त झाले आहेत. ग्रामीण भागात तर या कारणामुळे मुले शिक्षणापासून म्हणजेच शाळेपासून दुरावली जातात. कारण शिक्षणाला लागणारा खर्च हा त्यांच्या वडिलांना पेलवत नाही. पैसे  कमवण्याऐवजी घरातच असलेले पैसे काहीतरी कारण बनवून दारू पिण्यासाठी घेऊन जातात. या कारणामुळे घरात मारहाण पण केली जाते, एवढेच नव्हे तर मुलींची लग्न पण लवकरच केली जातात. अशा अनेक समस्यांना तोंड देत जगणे हे अवघडच असते. जी व्यक्ती या परिस्थितीमध्ये जगते त्यालाच या गोष्टी समजू शकतात. घरातील एक जरी व्यक्ती व्यसन करत असेल तर त्या पूर्ण कुटुंबाचे नुकसान आहे. यामुळे माणूस पूर्णपणेच वायाला जातो आणि हे समजणे खूप गरजेचं आहे. 
            

            व्यसन न करता माणूस चांगला राहतो व बोलतो. पण जर त्याच माणसाने व्यसन केले तर तो पूर्णपणे बिघडतो. व्यसनाने फक्त शारीरिक नाही तर सामाजिक व मानसिक ही नुकसान होते. खरोखरच व्यसनमुक्ती ही काळाची गरज बनलेली आहे. आपला देश हा व्यसनमुक्त करण्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न केले पाहिजेत. गावोगावी व्यसनमुक्ती केंद्र स्थापित केले पाहिजेत. जर असे केले तर गावच नाही तर पूर्ण देश व्यसनमुक्त होईल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.