वेळेचे महत्व/ Velelche Mahattv
वेळ ही खूप मौल्यवान व किमती गोष्ट आहे. वेळ ही कोणी ही विकत घेऊ शकत नाही. आज हे जग इतके प्रगतशील झालेले आहे तरीही वेळेला कोणीही थांबू शकलेले नाही. त्यामुळे वेळेचा योग्य सदुपयोग करता आला पाहिजे. जसे तोंडातून बोललेले शब्द आणि धनुष्यातून निघालेला बाण माघारी घेता येत नाही, त्याच प्रकारे एकदा गेलेली वेळही पुन्हा माघारी घेता येत नाही.
आयुष्यात यशस्वी झालेल्या लोकांच्या यशाचे रहस्य एकच असते आणि ते म्हणजे वेळेचा केलेला योग्य सदुपयोग. जो वेळेचा योग्य वापर करतो तोच आयुष्यात यशस्वी होतो. आणि जो वेळेला महत्त्व देत नाही, तसेच वेळही त्याला महत्त्व देत नाही.
जर एखादे काम आपण आत्ताच करायचे असे ठरवले, तर ते लगेच केले तर ठीक आहे, पण आपण म्हणतो की आत्ता कंटाळा आला आहे , उद्या करू, उद्याचे परवा करू, असं करत करत शेवटी ते काम करायचे राहूनच जाते. यामुळे आपण कधीच जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. आपल्याला नुसती कारणे देण्याची सवय लागलेली आहे. जसे एखादी वस्तू आपण विकत घेतली की, आपण त्याला किती जपतो. विकत घेतलेल्या वस्तूची किंमत आपल्याला कळते पण वेळ तर आपल्याला फुकटच मिळते ना. ज्या गोष्टीला किंमत नसते त्या गोष्टीला आपण काहीच मूल्य देत नाहीत. वेळही आपल्याला फुकटच मिळते पण ती अमूल्य आहे. हे आपल्याला कळायलाच तयार नाही. वस्तू खराब झाल्यानंतर आपण पुन्हा विकत घेऊ शकतो, पण एकदा गेलेली वेळ ही पुन्हा कधीच विकत घेता येत नाही. हे ज्याला कळते तोच जीवनात यशाच्या शिखरावर पोहोचतो. प्रत्येकाच्या आयुष्यात वेळेला खूप महत्त्व असते. हे ज्याला समजते तोच वेळेला महत्व देतो.
वेळेचे महत्व काय असते? हे एका खेळाडूला विचारा-की जो एका सेकंदामुळे खेळाचा सामना हरला आहे. वेळेचे महत्व त्या व्यक्तीला विचारा ज्याची एका सेकंदामुळे ट्रेन निघून गेली आहे. तेच आपल्याला सांगतील की एका सेकंदाचे महत्व काय असते?.
परीक्षा जवळ आल्यानंतर आपण विद्यार्थ्यांना अभ्यास करताना पाहतो. मग वर्षभर वाया घालवलेल्या वेळेचा त्यांना पश्चाताप येतो. कारण अचानक सर्व विषयांचा अभ्यास करणे अवघडच असते. शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच, समाजातील तरुणांनी वेळेचे योग्य नियोजन करायला पाहिजे. थोडासुद्धा वेळ वायाला घालवला नाही पाहिजे. कोणतेही काम हे वेळेवरच केले पाहिजे.
आज प्रत्येक जण आपल्या जीवनात एवढा व्यस्त झाला आहे की, त्याला स्वतःसाठीही वेळ देता येत नाही. पण प्रत्येकाने त्यातूनही वेळ काढून स्वतःचा विकास घडेल अशा रीतीने वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. तू माझा मित्र आहेस म्हणून, मी तुझ्यासाठी थांबतो व तू माझा शत्रू आहेस त्यामुळे मी तुझ्यासाठी थांबणार नाही. असं वेळ कधीच म्हणत नाही. वेळ ही कोणासाठीच थांबत नसते. आपल्यालाच वेळेला महत्त्व देता आले पाहिजे. वेळेचा चांगला सदुपयोग करूनच आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो. यामुळे वेळेला महत्त्व देणे खूप गरजेचे आहे. खरोखरच वेळ ही अनमोल असते.
Post a Comment