जीवनाला दिशा देणारी सहल- स्नेहालयाची/ Jivanala Disha Denari Sahal- Snehalayachi


            सहल म्हटलं की सर्वांनाच आनंद होतो. असाच आनंद मलाही झाला होता, जेव्हा मी आठवीत शिकत होते. खरं पाहता तर विद्यार्थी जीवनच अनमोल असते. जो या जीवनातून जातो त्यालाच याची चव कळते. 

            नेहमीप्रमाणेच दहा वाजता आमची शाळा भरली होती. परिपाठ ही झाला होता. वर्गात वर्ग शिक्षक येऊन, हजेरी घेऊन,  शिकवून निघून गेले. बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यास म्हटलं की कंटाळा येतो, मग आपण वाट पाहतो ती खेळाच्या तासाची किंवा अशा शिक्षकाची जे पोट भरून हसायला लावतात आणि अभ्यासही कमी घेतात. आम्हीही अशीच दुसऱ्या तासाची आतुरतेने वाट पाहत होतो. तेवढ्यात आमच्या सर्वांच्या आवडत्या सरांचा तासही आला व सर वर्गावरती आले. त्या दिवशी सरांनी नुसते हसवलेच नाही तर एक आनंदाची बातमी सांगितली की-आपली एक दिवसाची सहल जाणार आहे हे ऐकताच आम्ही खूप आनंदी झालो. मग काय, आमची नुसती मस्तीच चालू झाली. 

            ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी आम्ही सहा वाजता हजर झालो व सहलीसाठी निघालो. ज्या ठिकाणी पोहोचायचे होते तेथे पोहोचलो. पण, पाहतो तर काय? ना तेथे फिरायला गार्डन, ना प्राणी संग्रहालय, ना तिथे धबधबा, आम्ही जिथे पोहोचलो होतो ते एक वेगळेच ठिकाण होते. त्याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. कारण सहल म्हटल्यावर त्यात मौज मस्ती आलीच ना. आम्ही फक्त मज्जा करायची याच उद्देशाने सहलीला आलो होतो. 

            पण जेव्हा आम्ही आत मध्ये प्रवेश केला त्यावेळेस आम्हाला कळले की ज्या वयात आपण खेळायचा विचार करतो, त्याच वयात आपल्यासारखी काही मुले जीवनाशी खेळत असतात. कारण ज्या ठिकाणी आम्ही गेलो होतो ते ठिकाण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील "स्नेहालय" होय. खरोखरच त्या मुलांकडे पाहून असं वाटलं की, आपण जे जगत आहोत ना त्या पलीकडेही एक जग आहे. 

            स्नेहालयाचं सांगायचं म्हणजे-त्या ठिकाणी एड्स बाधित मुलांना स्नेहालय सांभाळते. एवढेच नव्हे तर ज्या मुलांना रोग असल्यामुळे सोडून दिले त्या मुलांना स्नेहालय आश्रय देते. गरिबीने ग्रस्त असलेल्या मुला-मुलींनाही स्नेहालय सांभाळते. हे सर्व पाहून मनात दुःखही झाले आणि आनंदही झाला. आनंद यासाठी की-आजही या जगात लोकांना समजून घेणारी, आधार देणारी माणसे आहेत. ते मी त्या दिवशी स्नेहालयात पाहितले.

            तेथील सरांनी आम्हाला सर्व स्नेहालयाची माहिती दिली. आम्हीही ती माहिती शांततेत ऐकत होतो. जेव्हा स्नेहालय चालू केले होते त्यावेळेस जास्त मुले नव्हते, पण आज हजारो मुलांना स्नेहालय आश्रय देत आहे. म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे  लहानातून आज हजारो मुलांचे मोठे स्नेहालय निर्माण झाले आहे. खरोखरच "स्नेहालय एक आश्रयाची माऊलीच" आहे. 

            जेव्हा आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो त्यावेळेस आम्ही पाहिलं की-तेथील मुलींनी एक रांगोळी काढली होती. ती नुसतीच रांगोळी नव्हती तर त्या रांगोळी मधून एकजुटीचे प्रेमाचे प्रतीक हा संदेश मिळत होता.

            खरोखरच ती एक आगळी वेगळी सहल होती. आजही ते क्षण आठवले की असं वाटतं-वेळोवेळी अशाच सहली जीवनात यावेत. ज्या की खरंच आयुष्य जगायला शिकवतात. एक दिवसाचीच पण अविस्मरणीय अशी सहल होती ती. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.