कोण होत्या फातिमा शेख? /Kon Hotya Fatima Sheikh?


            मुलींना शिकवले पाहिजे ,मुलींना शिक्षणाचा अधिकार असलाच पाहिजे .हे आपण आत्ताच नाही तर अनेक वर्षांपासून ऐकत आहोत .आणि यासाठी तर कित्येक आंदोलन ही झालेली आहेत. काही समाजसुधारकांनी मुलींना शिक्षणाचा हक्कही मिळवून दिलेला आहे. यात सर्वात महत्त्वाचे नाव म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे होय. पण सावित्रीबाई सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणारी, मदत करणारी त्यांचीच मैत्री म्हणजे फातिमा शेख यांच्या बद्दल आपल्याला एवढं काही माहीत नाही याबद्दलच आपण माहिती पाहणार आहोत.

            सावित्रीबाई फुले यांची कामगिरी आपल्याला तर माहीतच आहे. पण फातिमा शेख यांच्या बद्दल एवढी काही माहिती उपलब्ध नाही. कोण होत्या फातिमा शेख? हा प्रश्न तर आपल्या सर्वसमोरच उभा राहतो. लहानपणापासूनच आपल्याला सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांबाबत इतिहासाच्या पुस्तकात माहिती दिलेली असायची. पण फातिमा शेख यांच्या बद्दल आपण माहिती घेण्यास अडाणीच राहिलो.

            फातिमा शेख या एक इतिहासातील विसरलेल्या समाजसुधारक आहेत. त्या एक महान शिक्षिका, जातीविरोधी कार्यकर्ता होत्या. मुलींच्या शिक्षणाच्या हक्कातही त्यांचा खूप मोठा वाटा आहे. फातिमा शेख या महाराष्ट्रातील एक समाज सुधारक होत्या. जेव्हा 1840 मध्ये ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे मुलींच्या शिक्षणासाठी तडजोड करत होते. त्यावेळी समाजातील लोकांना ते आवडले नाही. लोक त्यांना याबाबत विरोधही करू लागले. जेव्हा लोकांचा विरोध हा हद्दपार झाला, त्यावेळेस ज्योतिराव फुले यांच्या कुटुंबाने त्यांना दोघांनाही घराबाहेर काढले. आणि त्यावेळेस सावित्रीबाई आणि ज्योतिराव यांना फातिमा शेख यांनी आपल्या स्वतःच्या घरात निवासस्थान दिले. एवढंच नाही तर मुलींना पहिले शिक्षण हे फातिमा शेख यांच्याच घरी देण्यात आले होते. फातिमा शेख ,सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांनी तिघांनी मिळून मुलींना शिकवले.

            खरं पाहता तर सावित्रीबाई फुले व फातिमा शेख या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. जेव्हा दोघींचेही अमेरिकी मिशनरी सिंथिया फरारद्वारे शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये नाव आले होते त्यावेळेस दोघींनी सोबत काम केले आणि सोबत प्रशिक्षण ही घेतले होते. दोघींनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन शिक्षणाचे महत्त्व मुलांना पटवून दिले. विशेषतः महिलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. कारण त्यावेळेस शिक्षण हे जागरूकतेसाठी खूप महत्त्वाचे होते. पूर्ण समाजाला शिक्षणाचे ज्ञान दाखवून दिले. परंपरेनुसार जे लोक ज्ञानापासून व शिक्षणापासून वंचित होते त्यांना शिक्षण देण्यासाठी दोघींनी एक मिशन बनवले. त्यासाठी लागणारे सर्व कामे दोघींनी एकमेकींच्या मदतीने पार पाडली. 1848 मध्ये सावित्रीबाई ,फातिमा आणि ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा पुण्यामध्ये चालू केली. पण जेव्हा फातिमा व सावित्रीबाई फुले घरोघरी शिक्षणाचा प्रचार करायला जायच्या त्यावेळेस लोकांचा विरोध त्यांना सहन करावा लागत असे. रस्त्याने चालत असताना त्यांच्यावर दगड, शेण टाकले जात असायचे. एवढे असूनही त्या मुलींच्या शिक्षणाबाबत लढतच राहिल्या. जेवढे प्रयत्न त्यांना करता आले तेवढे त्यांनी करूनच दाखवले आणि त्याचेच फळ आपल्याला आज दिसत आहे. त्यामुळे आज सावित्रीबाई फुले यांना पहिली महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते आणि फातिमा शेख यांना पहिली मुस्लिम महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. एवढेच नाही तर फातिमा शेख यांना उच्च जातीच्या हिंदूद्वारे आणि मुस्लिमांद्वारे या दोन्हींच्याही होणाऱ्या रागाला सामोरे जावे लागले होते. फातिमा शेख यांचा जन्म 9 जानेवारी 1831 ला पुण्यामध्ये झाला होता. त्या काळात शिक्षणाचे एवढे महत्व नसूनही मुलींच्या शिक्षणासाठी जे काही त्यांनी केले खरोखरच ते अविस्मरणीय आहे.

            फातिमा शेख यांचे नाव 9 जानेवारी 2022 मध्ये पूर्ण जगासमोर आले .कारण गुगलने फातीमाजींना आदरांजली वाहण्यासाठी डूडल बनवले होते, आणि गुगल ने डूडल बनवले म्हणजे त्याची माहिती पूर्ण जगभर होणारच ना. सोशल मीडियावरही त्यांचा खूप प्रसार झाला. गुगलमुळे सर्व जगभरातील माहिती तर आपल्याला माहीतच होते. पण आज या गुगलमुळेच एका थोर समाज सुधारक फातिमा शेख यांची माहिती पूर्ण जगासमोर आली. सावित्रीबाई सोबतच फातिमा शेख ही एक थोर शिक्षिका होत्या. अशा या महान शिक्षिकेला मनापासून अभिवादन!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.