अजिंक्य योद्धा- थोरले बाजीराव पेशवे/Ajinkya Yodha- Thorale Bajirao Peshave/
मराठ्यांना स्वराज्याच्या स्वप्नापर्यंत नेऊन पोहोचवणारे वीर पहिले बाजीराव पेशवे यांचे नाव आज आपण सन्मानाने घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले स्वप्न "हिंदवी स्वराज्य" हे होते. आणि याच स्वप्नावरती पाऊल ठेवून चालणारे व छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानणारे बाजीराव पेशवे आज जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या वीरगाथा ऐकून त्यांना कोणीही नतमस्तक केल्याशिवाय राहत नाही.
बाजीरावांचा जन्म भाद्रपद शुक्ल पौर्णिमा शके 1622 अर्थात 18 ऑगस्ट 1700 साली झाला होता. बाजीरावाचे मूळ नाव विसाजी होते. बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावानेही ते इतिहासात प्रसिद्ध आहेत. बालपणी वडिलांच्या बरोबर सवारी, शिकारीत राहिल्याने युद्ध कलेचे व राजकारणाचे ज्ञान त्यांस लाभले. बाळाजी विश्वनाथ भट व राधाबाई यांचे ज्येष्ठ पुत्र म्हणजे बाजीराव पेशवे होय. बाजीरावांचे वडील हे पहिले पेशवे होते. त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना शाहू महाराजांनी पेशवे हे पद दिले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर बाजीरावांना पेशवे हे पद देण्यात आले. पेशवे हे पद वंशपरंपरागत नसल्यामुळे त्यांना हे पद न मिळण्यासाठी अनेकजणांनी कट कारस्थाने रचली. परंतु त्यांचे मातृभूमीवर असणारे प्रेम, लढाईत चालणारी बुद्धी, शौर्य अशा अनेक निपुण गोष्टीमुळे शाहू महाराजांनी त्यांनाच पेशवे पद दिले. वडिलांनंतर दुसरे पेशवे आणि मराठी सेनातील एक श्रेष्ठ सेनानी म्हणून त्यांनी आपले कर्तव्य अगदी निष्ठाशीरपणे पार पाडले.
बाजीरावांना एक भाऊही होता. त्यांचे नाव चिमाजी आप्पा हे होते. बाजीराव हे शस्त्रात पारंगत होते तर चिमाजी आप्पा हे शास्त्रात. दोघांनीही पेशव्यांची शान वाढवली. बाजीराव कडे जेव्हा पेशवा पद आले तेव्हा ते फक्त वीस वर्षाचेच होते. वय कमी होते पण काम महान होते. बाजीराव हे पेशवे बनल्यानंतर शाहू महाराज फक्त नावापुरतेच राजे राहिले. विशेषत: ते साताऱ्याच्या सीमेपर्यंतच मर्यादित राहिले. मराठी साम्राज्य त्यांच्या आदेशानुसार चालत होते, परंतु संपूर्ण ताकत ही पेशवा बाजीराव यांच्याच हातात होती. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर थोरले बाजीराव यांचे नाव येते. ज्यांनी मुघलांसोबत कट्टर लढाई केली. ते एक महान योद्धा होते. दक्षिणेतील श्रीरंगपट्टण पासून संपूर्ण मध्य आणि उत्तर भारत हा बाजीरावने मराठ्यांना मिळवून दिला. राजपूत राजांपासून मुस्लिम नवाब आणि शहांना आपल्यापुढे नतमस्तक करायला लावले आणि मराठ्यांचा भगवा उत्तर हिंदुस्तानातही फडकवला. महालांपेक्षा ते रणांगणावरच जास्त राहिले. अवघ्या वीस वर्षातच राजकीय आयुष्यात मराठ्यांच्या सत्तेचे साम्राज्यात रूपांतर केले. बाजीराव पेशवे व त्यांची फौज ही शत्रूला चकवा देण्यात खूप माहीर होती. त्याचेच एक उदाहरण म्हणजे-1738 मध्ये बाजीराव पेशवे हे मोठ्या सैन्याशी घेऊन दिल्लीपर्यंत गेले होते. तेव्हा आग्र्यापासून दिल्लीपर्यंतचा 125 मैलांचा प्रवास त्यांनी शत्रूला चाहूल न लागू देता आडवाटेने फक्त दहा दिवसातच केला होता. शत्रूच्या तडाख्यातून सुटण्यासाठी दिल्लीपासून जयपुर पर्यंतचा प्रवास त्यांनी 180 मैल आठ दिवसात म्हणजे रोज 25 मैल असा केला होता. हा वेग खरच थक्क करणारा आहे.
शत्रूने आखलेल्या योजनांवरती मात कशी द्यायची हे त्यांना चांगलेच माहीत असायचे. अगदी शत्रूंना सळो की पळो करून सोडले होते. आपल्या बुद्धीचा वापर करून शत्रूला ताब्यात घेणे, अशा प्रकारचं स्वतःचं युद्धतंत्र त्यांनी विकसित केलेलं होतं. त्यांनी उभे केलेले सैन्य हे त्यांच्या जीवाला जीव देणारे होते.
एकदा दिल्लीचा वजीर मोहम्मद खान बंगेश हा बुंदेलखंडावर चालून आला होता. त्यावेळेस बुंदेलखंडाचे राजा छत्रसाल यांना शरणागती पत्करावी लागली होती. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने त्याच्यामध्ये शिस्त आणि चिकाटी पुरेपूर उतरलेली होती. त्याने 80 वर्षाच्या छत्रसालला छावणीमध्ये पूर्णपणे बंदिस्त ठेवले होते. त्यावेळेस छत्रसालने बाजीरावांना गुप्तहेर द्वारे पत्र पाठवले. कारण मुघलांना टाळ्यावर आणणारा असा एकच परमवीर योद्धा होता. पत्र मिळाल्यानंतर बाजीराव 30-40 हजारांच्या सैन्यासह मोहम्मद खान बंगेश आणि त्याच्या सैन्यांवरती चालून गेले. बाजीराव पोहोचेपर्यंत बंगेशला कसलीच चाहूल लागली नाही. बेसावध बंगेश आणि त्याच्या सैन्याला पराभवाशिवाय काहीच दिसत नव्हते व विजय हा बाजीरावांचाच झाला होता.
छत्रसालने झांसी प्रांत पेशव्यांना दिला व आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा ही त्यांना दिला. इतकेच नाही तर त्यांच्या पत्नींपैकी एका उप पत्नीची मुलगी मस्तानी त्यांनी बाजीरावांस दिली. बुंदेलांचे आणि मराठ्यांचे रक्त संबंध जुळावेत, कदाचित हाच हेतू त्याच्या मागचा असावा. बाजीरावांची प्रथम पत्नी काशीबाई या होत्या.
बाजीराव स्वतःचे काम स्वतःच करत असायचे. नोकराशिवाय त्यांचं कधीच काही अडत नसायचं. अगदी तेजस्वी असं व्यक्तिमत्व त्यांचे होते. आळशीपणा त्यांना बिलकुल ही आवडत नसे. रात्र ही झोपेसाठी नाहीतर झोपेत बेसावध असणाऱ्या शत्रू वरती मात करण्यासाठी असते असे ते म्हणत. रात्र दिवस त्यांना यशप्राप्तीचेच स्वप्न दिसत. 27 फेब्रुवारी 1740 ला नासिर विरुद्ध लढाई जिंकून मुंगी पैठण येथे तह झाला. या तहात नासिर ने हंडीया व खरगोण हे प्रदेश बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी 30 मार्चला बाजीराव हे खरगोण ला गेले. या सवारीमध्ये अचानक प्रकृती बिघडल्याने 28 एप्रिल 1740 रोजी नर्मदा नदी तीरावर रावेरखेडी या गावी थोरले बाजीराव यांचे वयाच्या 40 व्या वर्षी निधन झाले.
बाजीराव पेशव्यांनी 40 वर्षाच्या जीवनात 47 लढाया जिंकल्या. असे हे बाजीराव अपराजित सेनापती होते. मराठ्यांनी बाजीराव आणि मस्तानीच्या संबंधाची योग्य ती दखल घेतली नाही. पण जगाने बाजीरावांचे महान कर्तुत्व अनेक पुस्तकांद्वारे लिहून ठेवले आहे. असाच एक विचार सर रिचर्ड टेम्पल याने मांडला आहे. ते आपल्या लेखनाद्वारे म्हणतात की -तो जसा आपल्या माणसांमध्ये तंबूच्या कनातीखाली जगला तसाच मरण पावला. आजगायत तो मराठ्यांमध्ये लढवय्या पेशवा किंवा हिंदू चैतन्याचा अविष्कार म्हणून स्मरला जातो. हिंदुस्थानात मराठ्यांना मानाचे स्थान उभं करून दिले. बाजीराव पेशव्यांचे कर्तृत्व जगातल्या गाजलेल्या अजिंक्य युद्धाचेच आहे.
Nice
उत्तर द्याहटवा